पळशिकरांचा वाडा , पळशी ता. पारनेर

 ★ पळशिकरांचा वाडा  पळशी , ता. पारनेर  


महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जी इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखली जातात. अशा मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी. पळशी गाव हे भुईकोटातच वसले असल्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग ठरावा, इतके हे गाव टुमदार आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा व मंदिराची उभारणी केली.

भुईकोटात दगड व चौकोनी विटांचे चार वाडे आहेत. सध्या यातील केवळ एकच वाडा सुस्थितीमध्ये असून पाहण्यास खुला देखील आहे. हाच पेशव्यांचे सरदार आनंदराव पळशीकर यांचा वाडा. 

या वाड्यातील नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. पळशीकरांचा हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा एक अप्रतिम नमुनाच...

वाड्याच्या दरवाजा तसेच चौकटीवर उत्कृष्ट कोरीवकाम केलेले आहे. मुख्य दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. हा वाडा जेव्हा बांधला गेला तेव्हा चार मजली होता असे ग्रामस्थ सांगतात परंतु वर्षानुवर्षे पडझड झाल्याने आता केवळ दोन मजले शिल्लक आहेत. 

वाड्यात शिरल्यावर उजव्या बाजूला असणारे देवघर पाहण्यासारखे आहे. देवघराच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौकटीवर कोरीवकाम केलेले आहे. जुन्या पद्धतीचे देवघर, त्याची मांडणी, छत आणि लाकडी सजावट पाहातच राहावीशी वाटते. 

वाडय़ाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. वरच्या मजल्यावर जाता येते. वर गेल्यावर जाणवते की वाडा आता जीर्ण झालाय. ठिकठिकाणच्या भिंती ढासळल्यात. एवढय़ा सुंदर वास्तूची ही अवस्था पाहून वाईटही वाटते. 

पहिल्या मजल्यावरील खांब अननसाच्या पानासारखे कोरलेले आहेत. वाड्याच्या प्रत्येक खांबावर, एकसंध लाकडात अत्यंत बारकाईने कोरीव काम केलेले आहे. यातील आवर्जून उल्लेख करावीत अशी शिल्पे म्हणजे एकसंध लाकडात कोरलेली फुलांची परडी,देव-देवता व अंबारीसह असणारा हत्ती.

वाड्याची मालकी हि सध्या वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्याकडे असून ते सध्या इंदूर, मध्यप्रदेश येथे वास्तव्याला असतात. नवरात्र उत्सवात ते भेट द्यायला इकडे येतात. आजच्या वाड्याच्या अवस्थेवरून खाजगी मालकी असल्याने ऐतिहासिक ठेवा जपला जात नाहीये हीच खंत वाटते.

गावकऱ्यांनी गावाचे वैभव असणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूची काळजी घ्यायला हवी. अनामिक कलाकारांची ही अप्रतिम कलाकृती पाहण्यासाठी एकदा पळशीला आवर्जून भेट द्या एक वेळा...!!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची